राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आता शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वच विषयावर भाष्य केले. या वेळी त्यांनी सुरु असलेल्या राजकारणावरून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे?
आज ४० रेडे तिकडे गेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार आणि आमदारांसह गुवाहाटीला गेले आहेत. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज ४० रेडे तिकडे गेले आहेत. तीन चार दिवसापूर्वी भविष्य पाहण्यासाठी गेले होते. तुमचे भविष्य ज्योतीशाला विचारुन उपयोग नाही, कारण तुमचे भविष्य हे दिल्लीत ठरते, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.
पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर जो दावा केला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मिंदे मुख्यमंत्री सांगतील, अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू, पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो, असा सणसणीत टोला, उद्धव ठाकरेंनी लगावला. ''महत्त्वाचा मुद्दा आहे. इकडचे उद्योग न्यायचे आणि महाराष्ट्र कंगाल करायचा. इथे बेकारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचे आणि छत्रपतींचा अवमान करून आदर्शांवर टीका करायची. असे ते यावेळी म्हणाले. सोलारावर हक्क सांगितल्यानंतर आपल्या पंढरपुरचा विठोबा कर्नाटकात जाणार का? आपल्या वारकऱ्यांनी तिकडे जाऊन दर्शन घ्याचे का, असा सवाल त्यांनी केला.
बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद नरेंद्र मोदींचे
“आज भाजप भाकड पक्ष झाला आहे, यांच्या पक्षात आयात सुरु आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडून लोकं आयात केली जात आहेत. इथले गद्दार आमदार खासदार आहेत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असं सांगावं. यांना नाव शिवसेनेचं पाहिजे, बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद नरेंद्र मोदींचे पाहिजेत.” अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे.
देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा
राज्यात वीज कापणी सुरु आहे. लाईट बिलासाठी तकादा लावला जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ ऐकवत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना वीज बिल माफीची मागणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज तुम्ही त्या ठिकाणी आणि मी या ठिकाणी आहे. शेतकर्यांचे वीज बील माफ करा! खाली असताना वेगळी भाषा आणि वर बसल्यावर वेगळी भाषा? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा!” असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
महाराष्ट्रातील शेतकरी कधी तरी हेलिकॉप्टरने जाणार का?
“हा आमचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझं त्यांच्या सुबत्तेबद्दल काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातील शेतकरी असा कधी होणार? हा सवाल आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कधी तरी हेलिकॉप्टरने जाणार का? तुम्ही ज्योतिषाकडे जाता. आमचा शेतकऱ्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या त्याने कुणाला हात दाखवायचा?”, असा सवाल त्यांनी केला.