मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्या भारताचे राष्ट्रपिता म्हंटले होते. या विधानाचा शिवसेनेने सामनाच्या रोखठोकमधून समाचार घेतला आहे.नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असा सवाल उपस्थित केला. इतकंच नव्हे तर मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपला प्रश्न विचारून अस्वस्थ करीत आहेत, असा टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे. पण चिडून, संतापून, आदळआपट करून काय उपयोग? खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भाजपने करायला हवा, पण खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाकडे नाही. खरगे यांनी भाजपचा कुत्रा काढला. त्या कुत्र्यावरून संसदेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते असलेले खरगे हे गेल्या आठ दिवसांपासून तवांगमधील चीनच्या घुसखोरीवर चर्चेची मागणी करीत आहेत. त्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर चर्चा नाकारली जाते. पण खरगे यांनी ‘छू’ केलेल्या कुत्र्यावर मात्र भाजपचे मंत्री संसदेत खडाजंगी करतात. खरगे यांनी स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाविषयी मुद्दा मांडला. भाजपने स्वातंत्र्य लढय़ातील त्यांचे योगदान दाखवायला काहीच हरकत नाही!
अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी भाजप सहमत आहे काय? पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रत्येक भारतीयास आदर असायला हवा, पण महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी देशाच्या जनतेने दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ाचे ते जनक होते. मानवतेच्या प्रेमाखेरीज त्यांच्या हृदयात दुसरा कधी विचारच शिवला नाही. प्रेमाचा आणि शांतीचा प्रकाश विश्वावर टाकणारे ते एक महान दीपस्तंभ असल्याचे इतिहासात म्हटले गेले.
देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर म्हणजे पंतप्रधानपदी मोदी आल्यावर मिळाले. त्यामुळे 2014 नंतर एक नवा भारत निर्माण झाला व त्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत! उद्या 2024 नंतर राज्यशकट बदलले तर नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्याच्या पदवीचे काय करायचे? नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यांनी स्वातंत्र्य लढय़ाची प्रेरणा महात्मा गांधींकडूनच घेतली. मंडेला हे 27 वर्षे आफ्रिकेतील तुरुंगात होते. त्यांनीही गांधींप्रमाणेच ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला व साम्राज्यावर विजय मिळविला. त्यामुळे ते त्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्य लढय़ात, नागरी हक्कांच्या लढय़ात माणसांची बलिदाने होतात.
काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या लढय़ाची ठिणगी टाकली. टिळकांपासून गांधींपर्यंत, नेहरूंपासून सरदार पटेल, सुभाषचंद्र बोसपर्यंत प्रत्येकाने त्यात आयुष्याच्या समिधा टाकल्या. या स्वातंत्र लढय़ाच्या इतिहासात भाजप-संघ वगैरेंचे कोठे नामोनिशाण आहे काय? खरगे म्हणतात, निदान स्वातंत्र्य लढय़ातील तुमचा कुत्रा तरी दाखवा, असे आव्हान शिवसेनेने भाजपला दिले आहे.