राज्यातील राजकारणात काही महिन्यांपासून दिवसांपासून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. यासर्व गदारोळा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीसह राजकारणात एकच खळबळ माजली होती. दोन दिवस झालेल्या राड्यानंतर पवारांनी निर्णय मागे घेतला. मात्र, आता विरोधकांकडून मविआवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावरूनच आता शिवसेना शिंदे गट प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांची ती वज्रमुठ देखील सुटली आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले संजय शिरसाट?
उध्दव ठाकरे आणि मविआवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार यांचा राजीनामा नाट्य आणि त्यावरून दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेला ड्रामा पाहता राज्यात आता महाविकास आघाडी राहिलीच नाही. ती संपली आहे, त्यांची ती वज्रमुठ देखील सुटली आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, त्यांना रणभूमीत काय चालंलय ते दिसत नाही, आणि `संजय`, त्यांना काही खरी परिस्थीती सांगत नाही. शरद पवार जेव्हा म्हणतात महाविकास आघाडी टिकेल तेव्हा निश्चित ती तुटणार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बारसूमधील रिफायनरीला आता जो विरोध उद्धव ठाकरेंकडून केला जातोय, तो फक्त आपले अस्तित्व दाखवण्यासाठी होतोय. अशी टीका त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, कुठलाही प्रकल्प एका दिवसात येत नसतो, माझी दिशाभूल केली गेली हे जे ते सांगतायेत, आणि ते मान्य करतायेत की आपली दिशाभूल केली जाते, तर हे याआधी त्यांचे लक्षात का आले नाही? सोबतच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ते भाजप उमेदवारांच्या प्रचाराला गेले. या आधी उद्धव ठाकरे भाजप उमेदवारांच्या प्रचाराला जात होतेच ना? उद्या माझ्या मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना प्रचार करावाच लागेल, कारण आमची युती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तिकडे का गेले? या प्रश्नाला काही अर्थ नाही, असे शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.