नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आता वाद आणखीच तीव्र झाला आहे. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने या दोन्ही पक्षावर टीका करत आहे. यातच आता राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर देत संजय राऊतांना वेड्यात काढले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
जय राऊत यांनी केलेले आरोप खरे असतील असे तुम्हाला वाटते का? महाराष्ट्र हसायला लागला आहे या लोकांवर, कोणते आरोप करायचे कुणावर करायचे. आता म्हणतात निवडणूक आयोगाने 2000 कोटी रुपये घेतले आहेत. मी 50 खोके ऐकत होतो ते बरं वाटत होतं. कारण ती थोडीशी रक्कम होती. आता एवढी मोठी रक्कम निवडणूक आयुक्तांनी कोणत्या घरात ठेवली आहे हे देखील विचारून घेतलं पाहिजे असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
या लोकांच्या डोक्यावर आता परिणाम झाला आहे. यांना आता वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज असून, त्यांना थेट शॉक देण्याची गरज आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटत आहे की उद्धव ठाकरे यांना सहन करत आहे. बरं उध्दव ठाकरे यांची अवस्था अशी झाली की, धरलं तर चावतंय आणि पळलं तर भुंकतोय. संजय राऊतांसारखे दोनचार लोकं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही तर बिलकुल दखल घेत नाही, पण उद्धव ठाकरेंना दखल घेण्याची गरज असल्याचं शिरसाट म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली कामगिरी निभावल्यामुळेच संजय राऊत यांना वेगळी जबाबदारी सरकारमध्ये मिळाली होती. त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संजय राऊत यांना शॉक देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथ विधी झाला होता, त्यावेळी तो सकाळचा शपथविधी संजय राऊत यांना माहीत होता. मात्र एकनाथ शिंदे याी त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मुख्यमंत्री पद घेतलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.