नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे राज्याचे राजकारण एकदमच ढवळून निघाले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आधीपासून सुरु असलेला वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. या निर्णयावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यातच एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. यावरूनच आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाल्या म्हात्रे?
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. वेगवेगळे आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला आता शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, पक्ष गेला, चिन्ह गेले, पुरते कफल्लक झाले.. चोर चोर ओरडत सुटले, अगदी क्षुल्लक झाले.. लोकशाही बुडाली, शेण खाल्ले, ही काय भाषा आहे? माजुर्डेपणाला कायद्याने दिलेली ही तर शिक्षा आहे.. तुमचे वडील महान, मग तुम्ही एवढे लहान कसे? एका जबरदस्त फटक्याने झाले तुमचे भिजलेले ससे. असे उत्तरे देत त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.