राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने ठाण्यात लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी या आव्हानाला होकार देत पुन्हा चॅलेंज दिले होते. याच आव्हानांवर गदारोळ सुरु असताना आता शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
मुंबई माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलं आहे. त्यांचा अहंकार एवढा वाढला आहे की, आमदार सोडून गेले तरीही तो कमी झाला नाही. सत्ता गेली तरीही अहंकार कमी होत नाही. पक्ष संपत चालला आहे, तरीही अहंकार कमी होत नाही. आणि हा सर्व अहंकार वाढवण्यात संजय राऊत मदत करता. त्यात संजय राऊत पेट्रोल टाकून आदित्य ठाकरेंचा अहंकार वाढवत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्व देण्याची गरज नाही. असे देखील त्यांनी माध्यमांना सांगितले.
पुढे ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवातच दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवून झाली आहे. वरळी काही आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ नाही. तिथे असलेले सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेवून आदित्य यांनी राजकारणात पहिली पायरी ठेवली हे ते विसरले. राजकारणात एक निवडणूक लढवली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलो असे त्यांना वाटत. अरे आमच्या सारखे कार्यकर्ते आम्ही एवढ्या निवडणुका जिंकल्या आहेत, पण आमच्यात कधीही अहंकार आला नाही. असे शिरसाट यावेळी म्हणाले.