मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुरु आहे. परंतु, त्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळालंच पाहिजे. यासाठी बंडखोर आमदार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गौरवाचं निमित्त साधून शक्तीप्रदर्शन करत आहेत. आपापल्या मतदारसंघातले कार्यकर्ते घेऊन हे बंडखोर आमदार मुंबई गाठत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संजय बांगर यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांचा असाच सत्कार केला. त्यानंतर आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आपले कार्यकर्ते घेऊन शिंदे यांना भेटणार आहेत. तर, सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हेही उद्या एकनाथ शिंदे यांच्या दरबारी येणार आहेत. बंडखोर आमदारांचा मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शनाचा जणू ट्रेंडच सुरू झाला आहे. यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 19 जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, कोणाकडे कोणते खाते मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर, मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी आता शिंदे सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.