राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून जोरदार राजकरण सुरु असताना, अशातच दोन्हीकडून सध्या सुरवातीला पोस्टर्स, टीझर आणि त्यानंतर आता घोषवाक्यावरुनही वादंग सुरु आहे. शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटानेही आपले घोषवाक्य तयार केले आहे. हिंदू गर्व गर्जना, गर्व से कहो हम हिंदू हैं..! शिंदे गटाच्या या वाक्यावरूनच आता विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदे गटाच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!! #मिंधेगट अश्या शब्दात यावेळी त्यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटानं हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा केली आहे. काल औरंगाबादेत शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात भुमरे, सत्तार, शिरसाट या सगळ्यांनीच शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरच अंबादास दानवे यांनी आज त्यांच्यावर ही टीका केली आहे.