राज्यात एकीकडे जोरदार अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच शिंदे गट आणि ठाकरे गटात शिवसेना कोणाची आहे म्हणून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु आहेत. त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नार्वेकरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सोबतच मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावरच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
पुण्यात बोलत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा तोच फुसका बार आहे. जो भाजपने सोडला आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी यावेळी दिले आहे.
तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला एवढ्या मोठा पदावर बसवले
पुढे बोलताना त्यांनी राणे पिता- पुत्रांवर सुद्धा प्रहार केला आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की,राणे पिता पुत्रांबद्दल मला फार गांभीर्याने काहीच मांडावे असे वाटत नाही. राणे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मैदानात येता येणार नाही. त्यांना पव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल. कोण ठाकरे? असं विचारता पण त्याच ठाकरेंनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला एवढ्या मोठा पदावर बसवले. याच ठाकरेंमुळे आणि याच मातोश्रीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. नाहीतर ठाकरे नसते तर नारायण राणे कणकवली लिमिटेड कंपनी इतके मर्यादित असते, अशी जोरदार टीका यावेळी अंधारे यांनी राणेंवर केली.