मुंबई : सध्या वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपचा मराठमोळा दीपोत्सव सुरु आहे. तर, ठाण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. यावरुन किशोरी पेडणेकर यांनी शिंदे-भाजपवर निशाणा साधला आहे. अनेक जण अमाप पैसा खर्च करून दिवाळी पहाट साजरी करत आहेत, अशी टीका पेडणेकरांनी केली आहे.
किशारी पेडणेकर म्हणाल्या की, सध्याचं राजकारण भयंकर झालेलं आहे. अनेक जण अमाप पैसा खर्च करून दिवाळी पहाट साजरी करत आहेत.
बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण, जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. हा केविलवाणा प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. बाकी शिंदे गटातील वाचाळवीरांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.
ज्यांनी स्वतः काही अडीच वर्षात केले नाही ते आता टीका करायला पुढे आलेत. दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती. नवीन सरकारने सर्व मर्यादा बाजूला केल्याने सण उत्साहात साजरे होत आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हंटले होते. याला प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या, आमच्या सरकारने गेली दोन वर्ष लोकांचे जीव कसे वाचतील याचा विचार केला. म्हणून आज या सरकारमध्ये सण साजरे करायला मिळत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.