राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी सुरु असताना, शिवसेना आणि शिंदे गटाच्या नाव आणि चिन्हावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवल्यानंतर आता आयोगाने नव्याने ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला नवे नाव व चिन्ह दिले आहे. अखेर आज संध्याकाळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. यावरून अनेक राजकीय मंडळीकडून या चिन्हावर प्रतिक्रिया येत आहे. सोबतच उद्धव ठाकरे गटाकडून यावर जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर विखारी टीका केली आहे.
काय केली दानवेंनी टीका?
शिंदे गटाला आज चिन्ह मिळाल्यानंतर अनेक राजकीय मंडळीकडून प्रतिक्रिया येत असताना अंबादास दानवे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार... व्वा रे जोडी! #मिंधेगट अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे. सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्हं दिलं. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळी निशाणी आहे, ढाल-तलवार ही मराठमोळी निशाणी आधीच प्रत्येकाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आम्हाला आता हे चिन्ह नव्याने पोहचवण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली आहे.