राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच काल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. त्यावरच आता शिंदे गटाने प्रत्युत्तर देत उलट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान दिले आहे.
काल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणूक लढण्याचे आव्हान केले. त्याच आव्हानाला प्रत्युत्तर देताना शिंदे गट नेते शंभूराज देसाई म्हणाले की, एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहू देत आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणुक लावायची तयारी असेल तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी, तसेच निवडून येऊन दाखवावे. ज्यांच्या मागे ५० आमदार व १३ खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये. त्यांनी पाटणमध्ये येऊन निवडणूक लढवावी व निवडुन येऊन दाखवावे. असे प्रतिआव्हान मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.
काय दिले होते आदित्य ठाकरेंनी आव्हान?
मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले होते.