मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा इगतपुरी येथून आजपासून सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीला जातात. पण लोकांसाठी गेलेले कधी ऐकलं का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसंवाद दौरा हाती घेतला आहे. गद्दारी करून सरकार पडल्यानंतर चौकाचौकात सभा घेतल्या. त्यानंतर गावागावात जाऊन संवाद साधण्याचे ठरवलं. 50 लोक सामोरे असले तरी त्यांच्याशी जाऊन बोलणार. पण, चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, 50 खोके खर्च करून पण 50 लोक जमत नाहीत. किती दिवस सरकार टिकणार माहित नाही. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे त्यांना रोखून ठेवलं, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.
शेतकरी त्रस्त आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत. अनेक ग्रामीण भागात रस्ते नाही आहेत. महाराष्ट्रासाठी काय करता येईल त्यासाठी मी आणि वडील उद्धव ठाकरे आम्ही रात्रभर चर्चा करायचो. शिवसेनेच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग जास्त असतो कारण त्यांचा उद्धव साहेबांवर जास्त विश्वास आहे.
मुंबईला पाणी नेण्यासाठी आम्ही इथे धरण बांधलं. पण, राज्य सरकारने या ठिकाणी पाणी अडवलं नाही. येथील अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. कंपनीचे नाव घेणार नाही, त्यांचं पण नुकसान झालं असेल. पण, स्थानिकांचं किती नुकसान झालं हे समोर आलं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळायला हवा. मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीला जातात. पण लोकांसाठी गेलेले कधी ऐकलं का? गेले ते गद्दार राहिले ते शिवसैनिक, असेही त्यांनी म्हंटले आहे.