राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आता शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगेलच धारेवर धरले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानासोबतच सुप्रिया सुळेंबद्दलच्या केलेल्या विधानावरून मंत्री अब्दुल सत्तार यांचा देखील चांगलाच समाचार घेतला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अब्दुल सत्तार नाही अब्दुल गटार, मी मुद्दामहून म्हणतोय. त्याने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. मी मुख्यमंत्री असतो तर महिलांचा अपमान करणाऱ्याला लाथ घालून हाकलून दिले असते, एकाला हाकललं तसं. तुम्ही वाघ आहात की गांडूळ आहात?” अशी टीका ठाकरे यांनी यावेळी सत्तारांवर केली.
राज्यपालांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही”, तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल तर तुमचं वय किती असेल तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. एका बाजुने लंडनमधून तलवार आणण्यास सांगायचे आणि दुसरीकडे कोश्यारी त्याच शिवाजी महाराजांविरोधात बोलणार. वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करून ठेवावा लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.