राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना, आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. तब्बल सहा तास चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची व पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावरच शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार. आम्ही निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रीया पुर्ण करू. हा धक्का नाही तर प्रक्रीयेचा एक भाग आहे असे देसाई म्हणाले. आतापर्यंत आम्ही त्यांची प्रक्रीया पुर्ण करत आले आहोत. मात्र निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुरावे देऊ. आम्हाला पुढच्या सुनावणीत नक्की न्याय मिळेल असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.