राजकारण

'शिवसेनेचे अस्तित्व संपवण्यासाठी 40 गारद्यांनी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी केली'

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्याने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. यानंतर आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्याने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. 40 डोक्याच्या रावणानं रामाचं धनुष्य गोठवलं. अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाने निर्णय महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधकार निर्माण केला. बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली. शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल. गेल्या छपन्न वर्षांत देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यास जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले. त्याकामी दिल्लीने त्या गारद्यांना साथ दिली. शिवसेनेवर असे घाव घालून या गारद्यांनी महाराष्ट्र पांगळा केला, मराठी माणूस कमजोर केला आणि हिंदुत्व रसातळाला नेले असेच म्हणावे लागेल. एक मुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे या सौदेबाजीत महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या या अवलादीपुढे औरंगजेबाचा दुष्टपणाही कमी पडेल. भारतीय जनता पक्ष या सगळय़ाचा सूत्रधार आहे, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेना हा न विझणारा वणवा आहे, हे माहीत असल्यानेच काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली. त्यातूनच कोणीतरी एक ठाण्याचा गारदी उठला, त्या गारद्याच्या हातात भाजपने त्यांची तलवार दिली व शिवसेनेवर वार करायला लावला. पैशांचा व केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर याकामी झाला आणि निवडणूक आयोगानेही गारद्यांच्या बापांना हवा तसाच निर्णय दिला. वास्तविक लाखो शिवसैनिक पक्षाचे सदस्य असताना निवडणूक आयोगाने राजकीय मिठास जागल्याप्रमाणे निर्णय द्यावा हा सरळ सरळ अन्याय आहे. एक धगधगता विचार मारण्याची ही कपटखेळी आहे. ‘धनुष्यबाण’ निशाणी शिवसेनेस मिळणार नाही असे शिंदे व त्यांचे गारदी सांगत होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्वच राहू नये यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी केली. कुठे फेडाल हे पाप, अशी टीकाही शिवसेनेने शिंदे गटावर केली आहे.

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक घाव आणि आघात पचवले. शिवसैनिकांच्या रक्त आणि त्यागातूनबहरलेल्या शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारीत विकट हास्य केले असेल. शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही!

मात्र स्वतःच्या आयुष्याचे शिंपण करून ‘शिवसेना’ नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज ज्या वेदना, दुःख होत असेल त्याचे काय? हे पाप ज्यांनी केले आहे ते शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी