मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. यानतंर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यावरुनच शिवसेनेचे मुखपत्र सामना (saamana) मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सध्या असलेले फडणवीस-शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. पंगत मांडलीय, मांडव सजलाय, पण बँडबाजा वरात रस्त्यात अडकलीय. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर रोक लावणे, ठाकरे सरकारचे लोककल्याणकारी निर्णय थांबवणे, आरेचे जंगल नष्ट करणे असले प्रकार केले जात आहेत.
या 'प्रेमरोगा'ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय व्हायचे ते होईल, पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेडेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील, अशी टीका शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’वरच भागवावे लागले. दोघांत तिसरा कधी? दोनाचे चार हात कधी? वासू-सपनाच्या संसारवेलीवर पाच-पंचवीस फुले कधी बहरणार? की कायमचेच ‘प्लॅनिंग’ करावे लागणार? याबाबत दोन्ही बाजूंचे वऱ्हाडी साशंक आहेत, असाही निशाणा सामानामधून साधला आहे.