मुंबई : महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनावरुन शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे, असे शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हंटले आहे.
महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. पण, त्याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजीच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून कोटय़वधी हिंदूंचे शेकडो वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यामुळे त्या घटनेस आमचा विरोध आहे, हे दाखविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांनी काळे कपडे घालून आजच्या दिवशी आंदोलन केले, असे अमित शहा यांनी सांगितले. प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.
लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळय़ा कपडय़ांचाच सोस आहे. भाजपनेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा. असे शिवसेनेने सांगितले आहे.