राजकारण

'अशा संशोधकांना एका पोत्यात घालून महासागरात बुडवायला हवे, तरच...'

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. यावरुनच आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून हर हर महादेव चित्रपटावर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले आहे. यावरुनच आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून हर हर महादेव चित्रपटावर टीका केली आहे. इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये. पण अशी मोडतोड झाल्याचे आक्षेप काल झळकलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबाबत जसे घेतले गेले तसे यापूर्वीच्या काही चित्रपटांबाबतही घेण्यात आले होते. काही लोकांनी ‘तानाजी’ चित्रपटातील काही दृश्ये यानिमित्ताने समोर आणली. मध्यंतरी एका चित्रपटात अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या बाजीराव पेशव्यांना ‘बॉलीवूड’ पद्धतीने नाचताना दाखवले होते आणि त्यावरही आक्षेप घेतला गेला होता. झाशीच्या राणीवरील चित्रपटातील काही दृश्ये आक्षेपार्ह वाटल्याने करणी सेनेने दंड थोपटले होते. पृथ्वीराज चौहान यांच्यावरील चित्रपटालाही आक्षेप घेऊन इतिहासावर वादंग निर्माण करण्यात आले होते. आता काही मराठी ऐतिहासिक चित्रपटांत दाखविलेल्या प्रसंगांवरून वाद उभा राहिला आहे.

महाराष्ट्राची दोनच दैवते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोन्ही दैवतांना महाराष्ट्रच नव्हे, तर देश सदैव पुजत असतो. या दैवतांच्या प्रतिमा आणि श्रद्धांना कोणी तडे दिले तर महाराष्ट्र खवळून उठतो. आताही इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध राज्याचे वातावरण तापले आहे. ‘हर हर महादेव’ नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही.

राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड ‘गल्लाभरू’ चित्रपटांसाठी केली जाऊ नये.

इतिहास हा जशाचा तसा कधीच बनू शकत नाही. त्याचे स्वरूप व विवरण सारखे बदलत असते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा