निसार शेख, रत्नागिरी
सध्या शिवसेनेचे खासदार असलेल्या जागांवर आम्ही लढण्यासाठी आग्रही असून उमेदवारांची तयारीही केली आहे. त्यामुळे रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेकडे राहणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल, असे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपाला चांगला जनाधार असल्याने ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंची मागणी असल्याचे भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत नमूद केले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून सामंत यांनी या जागेवर दावा केला आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीतर्फे या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या जातील. पण सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा शिवसेना लढवेल, हे स्वाभाविक आहे.
रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्या दृष्टीने आम्ही उमेदवारांची तयारी केली आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील. पण माझे बंधू किरण सामंत येथून रिंगणात उतरण्यास तयार असतील तर साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजय निश्चितपणे होईल. या मतदारसंघावर भाजपाचे माजी आमदार जठार यांनी दावा केला आहे. यावर सामंत म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. इच्छुक कोणीही असू शकते. जठार निवडणुकीसाठी इच्छुक असतील तर त्याची माहिती आपल्याकडे नाही. परंतु संपूर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले आपले बंधू किरण सामंत निवडणूक रिंगणात उतरल्यास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल.