प्रशांत जगताप | सातारा : मुंबई : ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी भेट घेत विचारपूस केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असल्याची टीका त्यांनी केली होती. यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यावर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया देत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा. दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असं बोलत असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, अशी वक्तव्य थांबवावी अन्यथा ज्या-त्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो, असा इशाराही शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला आहे. मात्र, आमची अशी परंपरा नाही त्यामुळे अशी वक्तव्य थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. परंतु, त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलं. तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले.. दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी खरमरीत टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले होते. जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही. ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं, असा इशारा त्यांनी यावेळी ठाकरेंना दिला होता.