मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा आझाद मैदान येथे काढण्यात आला होता. यावर आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्याचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू- मुसलमान हा खेळ सुरू केला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून याविरोधात भाजप व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. पण, हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, अशा शब्दात शिवसेनेवर भाजपवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. या आधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. याबाबतीत कठोर कायदे व्हायला हवेत. याबाबत कुणाच्याच मनात शंका नाही, पण एखाद्या निवडणुकीचे बिगुल वाजले की, भाजपशासित राज्यांत अचानक हिंदू ‘खतऱ्या’त येण्याची हालचाल सुरू होते, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. हिंदू जन आक्रोश’ हा प्रकार फक्त निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठीच असेल तर ती हिंदुत्वाशी बेइमानी ठरेल.
प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारने मुलायम यांना पद्मविभूषणाने गौरवान्वित केले. हा राममंदिरासाठी बलिदान केलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. कारण या हिंदू कारसेवकांना गोळय़ा घालून ठार करण्याचे आदेश मौलाना मुलायम यांचेच होते. त्यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानेच हिंदू जन आक्रोश उसळला व शिवसेना भवनासमोर जमा झाला. त्या सगळय़ांचे शिवसेनेवर ‘लव्ह’ आहे व दिल्लीच्या ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध ‘जिहाद’ आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरुद्धचा त्यांचा आक्रोशही महत्त्वाचा आहे.
एक बरे झाले की, हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल, असे शिवसेनेने म्हंटले आहे.