Maharashtra Politics Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांना आणखी एक दणका दिला आहे. संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर (Deepak Kesarakr)यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांची बैठक झाली. यात शिवसेनेचे 14 खासदारही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या बैठकीत असे काहीच झाले नाही, अशा वृत्ताचे खंडन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये असेही केसरकर ठामपणे सांगितले.
शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.