मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिवंगत मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण सन्मान देण्यात आला आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार यावेळी का केला नाही? आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिराबाबत घेतलेल्या भूमिकेवर आमचा आक्षेप आहे, विरोध आहे बाकी मुलायम सिंग यादव हे मोठे नेते आहे. अयोध्यामध्ये जे कांड झाले त्याबाबत आमचा मुलायम सिंग यादव यांना विरोध आहे. त्यावेळी भाजप यांनी उल्लेख हत्यार असे केले.
वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार यावेळी का केला नाही? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरीबाबत कडवट भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही ते चित्र लावले आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावरती बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचे सरकार करतय का? हे पाहावे लागेल, असा निशाणा संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.
जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय सर्व्हे हा भाजपच्या बाजूने आहे हा त्यांना हवा आहे. मात्र, महाराष्ट्रातील सर्व्हे त्यांच्या विरोधात आहे म्हणून त्यांना नको वाटत आहे. त्या सर्व्हेनुसार लोकसभेत 34 जागा मिळतील, असा अनुमान आहे. महाविकास आघाडीला मात्र आम्ही म्हणत आहे या जागा महाविकास आघाडीला साधारण 40 ते 45 असतील. मुख्यमंत्र्यांना वाटतं चार-पाच जागा मिळाल्या तरी पुरे. माझा असं म्हणणं आहे कल्याण डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे त्यांनी, असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप प्रस्ताव आले नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. यावर संजय राऊत यांनी शरद पवार म्हणत आहे ते खरे आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचितची चर्चा झालेली नाही. फक्त शिवसेना आणि वंचित दोन पक्षांमध्येच चर्चा झालेली आहे. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत ते बरोबर आहे, असे म्हंटले आहे.