मुंबई : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मनभेद नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे दाखवून दिलं, असे त्यांनी म्हंटले आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुम्ही नवखे आहात. तरीदेखील तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका करतात. अशाही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना घेऊन शरद पवार एकाच गाडीतून जातात. त्यांनी मनभेद नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे दाखवून दिलं आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला मारला आहे.
नारायण राणे यांना कळून चुकल आहे की त्यांना मातोश्रीशिवाय पर्याय नाही. कोर्टाच्या सुनावणीवर त्यांनी बोलू नये. परंतु, जे पळून गेले त्यांना एबी फॉर्म उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आता देशात लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे. अजूनही न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकून आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत टीका केली होती. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमके हवेत कोण आहे हे त्यांनी तपासले पाहिजे, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी शरद पवारांना दिले होते.