राजकारण

'लुटा आणि खा, थोडे वाटा' ही वाटमारी अनैतिक; शिवसेनेचा शिंदे गटावर निशाणा

शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे गटावर टीकास्र सोडले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप केले होते. यावरून आता शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा देतात. मात्र, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

सध्याच्या राजकारणातून नैतिकतेचे पूर्णपणे अधःपतन झाले आहे. महाराष्ट्रात एक सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवर आले व ते रोज अनैतिक कामे करीत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. पण ते सर्व मंत्री आजही निर्लज्जासारखे आपल्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोगस-बनावट डिग्री घेतल्याचा घोटाळा समोर येऊनही सरकारमधील हरामखोर स्वतःस हरिश्चंद्राचे अवतार मानून मंत्रालयात बसले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर दिलेले राजीनामे उठून दिसतात.

पंतप्रधान मोदी हे नैतिकतेचे धडे अधूनमधून देत असतात; पण ती नैतिकता महाराष्ट्रात कणभरही झिरपलेली दिसत नाही. त्यामुळे तुमचे ते लोकपाल, लोकायुक्त काय करणार? त्यांचेही निवडणूक आयोगाप्रमाणे राजकीय कळसूत्री बाहुलेच होणार आहे. अशा घटनात्मक पदांवर आपापल्या मर्जीतली माणसे बसवून त्यांच्याकडून नैतिकतेचे मुडदे पाडून घ्यायचे व त्या खुनाचे शिंतोडे आपल्या अंगावर पडू द्यायचे नाहीत. महाराष्ट्र सध्या या कामात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री महोदयांना वाटते ते क्रांतिदूत आहेत. चार महिन्यांपूर्वी आपण कशी क्रांती केली त्याची छापील भाषणे सध्या ते देत आहेत. एकूण 16 भ्रष्ट राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणताही सारासार विचार न करता क्लीन चिट दिली गेली. यालाच क्रांती म्हणायचे काय, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

खरे म्हणजे हा तर अनैतिकतेचा अतिरेकच झाला. सरकारचे मंत्री रोज चूळ न भरता सकाळीच भोंगा वाजवतात, ‘याला तुरुंगात टाकू आणि त्याला तुरुंगात टाकू.’ म्हणजे सरकारने न्यायालयावर स्वतःचे लोक नेमले आहेत काय? भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार आहे. नैतिकता त्या चिखलात तळाला बुडाली आहे. आम्ही भ्रष्टाचारावर बोललो की आमचे तोंड दिसते; पण तुमच्या तोंडास काळे फासण्याचे समाजकार्य भारतीय जनता पक्षानेच हाती घेतले आहे. सरकारातील एकाच गटाची प्रकरणे धरण फुटल्याप्रमाणे का बाहेर पडत आहेत? आता तर भाजपचे ‘कष्टकरी’ खासदार गोपाल शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीवरच काही आरोप केले.

पण एन.आय.टी. भूखंडाचे वाटप, गायरान जमिनीची विक्री आणि खेळाडूंना कोटींचे दान अशा सरकारी कामांसाठी एक वेगळीच मार्गदर्शक प्रणाली सध्या महाराष्ट्रात दिसत आहे आणि ती म्हणजे, ‘‘लुटा आणि खा, थोडे वाटा.’’ ही वाटमारी अनैतिक आहे. पंजाबातील मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामे दिले. महाराष्ट्रात नैतिकतेचा दुष्काळ पडलाय. काय करायचे! पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देतात. महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेने शिंदे गटावर केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result