राजकारण

नेहरूंची चूक सुधारण्यासाठी मोदींनी 8 वर्षांत काय केलं? ठाकरे गटाचे टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांची जात तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. यावरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने सामना मुखपत्रातून मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले, असे विधान गुजरातमध्ये केले आहे. ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी?

मोदींचे पहिले विधान स्वतःच्या जातीविषयी आहे. पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरे नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झाले. अनेक मोठय़ा राज्यांनी मोदी यांना भरघोस मतदान केले. तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती.

गुजरातमध्ये शहरी नक्षलवाद वाढतो आहे, त्यापासून धोका आहे. ही चिंतेची बाब आहे, पण हा धोका संपूर्ण देशातच निर्माण झाला आहे. त्यात मुसलमानांचा सहभाग नसल्याने ‘भाजप’ त्यावर बोंब मारू इच्छित नाही, पण शहरी नक्षलवादाने अनेक राज्ये पोखरली आहेत, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.

आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली. देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही. कश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदारांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत. मोदी कश्मीर व नेहरूंबाबत हे भाषण करत असताना तिकडे कश्मीरात काय सुरू होते? 10 ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर व इतरत्र रस्त्यांवर उतरले होते.

नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न पडावा अशी त्यांची वक्तव्ये आहेत. पुन्हा त्यांना आता गुजरात निवडणुकीच्या चक्रव्यूहात पक्षाने अडकविले, म्हणजे कश्मिरी पंडितांच्या किंकाळय़ा हवेतच विरणार, अशीही टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने