केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील 'विचार पुष्प' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी या प्रकाशन सोहळयाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यावर बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेने बेईमानी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काय म्हणाले फडणवीस?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना फडणवीस म्हणाले की, "आज राज्यात परिवर्तन झाले आहे. आपल्यासोबत शिवसेनेने बेईमानी केली होती. बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली. या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होतंय", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2014 साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. 117 ते 118 जागा लढणाऱ्या भाजपाने 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप, मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी संकलित केलेल्या ''विचार पुष्प'' पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष श्री आशिष शेलार हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.