राजकारण

शिवरायांचा अपमानाच्या पटकथेत भाजप सहभागी; शिवसेनेचा आरोप, माफी मागा नाहीतर...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावर एकच राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीका होत आहे. तर, आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना माफी मागा...नाहीतर स्वत:लाच जोडे मारामहाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे, अशी टोला शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकाराला लगावला आहे.

आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? ‘‘शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली’’ या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले.

शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे? शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागता आणि गरज संपताच त्याच शिवरायांचा अपमान करता? अशा शिवरायद्वेषी राज्यपालांकडून ‘मिंधे-फडणवीस’ मंडळाने शपथ घेतली आहे म्हणून अशा राज्यपालांना लगेच हटवा असे सांगण्याचे धाडस तुमच्यात नाही. अशा प्रकारे शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू