राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडल्यानंतर आज राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र, राजकीय खळबळ आजही थांबलेली नाही. नुकताच राज्याचे अनेक काळवधीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघात पहिल्यांदाच कार्यक्रमाचं आयोजन केले होतं.
यावेळी अफाट गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र कार्यक्रमाला मोजकेच कार्यकर्ते उपास्थित होते. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. एवढंच नाही तर सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरु होणार होता, मात्र तो संध्याकाळी चार वाजता सुरू झाला. दरम्यान या आधी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पैठणमध्ये सभा पार पडली होती, त्यावेळी अलोट गर्दी जमली होती. त्यामुळे शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे.
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ केला ट्वीट
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ ट्वीट करत टीका केली आहे. 'सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रकटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!' अशा शब्दात दानवेंनी भूमरेंवर टीका केली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त पैठण शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री संदिपान भुमरे हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या मतदार संघ पैठण येथे येणार होते. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मोजक्याच लोकांच्या समोर मंत्री भुमरे यांनी भाषण केले. कार्यक्रम स्थळी अनेक खुर्च्या रिकाम्याच असल्याचे पाहायला मिळाले.