महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यातच शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरु होता. या मेळाव्याबाबत आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. कोर्टाने शिंदे गटाला झटका देत, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेत जल्लोष चालू असताना शिंदे गट आता या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्यापर्यंत शिंदे गट याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेकडून जल्लोष साजरा होत असताना आता शिंदे गटाचे नेते व मंत्री दिपक केसरकर यांनी सुप्रिम कोर्टात जाण्याबाबत संकेत दिले आहेत. सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, 'आमच्याकडे सुप्रिम कोर्टात जाण्याबाबतचा पर्याय खुला आहे.' असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे समजत आहे.
उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या लढतीत हा शिवसेनेचा मोठा विजय मानला जात आहे. हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार हे निश्चित झाले आहे.