राज्यात सध्या शिंदे गटात आणि शिवसेनेत जोरदार वाद सुरु आहे. अशातच शिवसेना नेते औरंगाबाद माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल शिंदे गटाबाबत खळबळजनक भाकीत केले होते. त्यावरच आता शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विमानाचं रिझर्वेशन कसं करायचं हे मला माहिती आहे. रेल्वेचा रिझर्वेशन कसं करायचं मला माहिती आहे. असा टोला शहाजी बापू पाटील यांनी खैरेंना लगावला आहे. \
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
काल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर मी हिमालयात जाईन.असे विधान केले होते. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, विमानाचं रिझर्वेशन कसं करायचं हे मला माहिती आहे. रेल्वेचा रिझर्वेशन कसं करायचं मला माहिती आहे. हिमालयाची गुहा कशी रिझर्व्ह करायची हे आम्हाला अजून कळलेली नाही. तिकडे दिल्लीला जाऊन एक गुहा त्यांच्यासाठी ठेवायचे आहे. एका वर्षाने तुम्हाला चंद्रकांत खैरे यांना भेटायला हिमालयाच्या गुहेत जावं लागेल, अशी जोरदार टीका शहाजी बापू पाटील यांनी खैरेंवर केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी सगळं शिवसेनेचं वाटोळं केलं. बाप चोरलं अशी टीका मुख्यमंत्री पदी राहिलेल्या माणसाच्या तोंडी शोभून दिसते काय, असा सवाल बोलताना त्यांनी उपस्थितीना केला.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
"उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास देण्यासाठी दसरा मेळावा घेऊन मोठा खर्च केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महत्वाची खाती दिली. ज्यांनी मोठं केलं त्यांना आपण विसरायचं नसतं. जनता यांना माफ करणार नाही, त्यामुळं हे पन्नासच्या पन्नास आमदार नाही पडले ना माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर मी हिमालयात जाईन. कारण हा शाप आहे जगदंबेचा. जनतेला गद्दारी आवडत नाही. आत्तापर्यंत शिवसेनेतून जेवढे निवडून गेले ते कधीही निवडून आले नाहीत" अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते.