काल शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगेलच धारेवर धरले. मात्र, या सभेत सर्वच ठाकरे गटाच्या नेत्यांनी खोक्यावरून शिंदे गटाला टार्गेट केले होते. यावरून आता शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे टीका करण्यासाठी दुसरे कोणतेच विषय नाहीत. त्यामुळे ते खोक्यांचा आरोप करत आहेत, असाही दावा त्यांनी केला. तसेच खोके कुणाकडे जाऊ शकतात ते सर्वांना माहितीय, असा टोला संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
काय म्हणाले गायकवाड?
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देतांना संजय गायकवाड म्हणाले की, “जे बोलले ते खोके, बोके या विषयीच बोलले. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही. खोक्यांच्या विषयाशिवाय दुसरा विषय तुम्हाला गेल्या तीन-चार महिन्यामध्ये मांडता आला?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. “उद्धव ठाकरेंनी सीआयडी किंवा कोणतीही तपास यंत्रणाच्या माध्यमातून एक तरी पुरावा खोक्यांच्या आणून दाखवावा. त्यांनी जर हे केलं तर आम्ही आयुष्यर त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी एकदा तरी सिद्ध करुन दाखवावं”, असं आव्हान संजय गायकवाड यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, “पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा मेळावा कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी त्या ठिकाणी भाषण केलं त्यापैकी कुणीही शेतकऱ्यांच्या विषयवार बोललं नाही”, “शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, वेदना, अडचणी यावर कोणी बोललं नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सरकारने काय करावं, याबद्दलही कुणी काहीच बोललं नाही. मला त्या सभेमधून शेतकऱ्यांसाठी काही निष्पन्न झालं, असं काही दिसलं नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.