कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. यानंतर आता राजकीय वातावरण तापले असून शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो, अशा शब्दात सामंतांनी टीका केली.
संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल. महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. शिस्तभंगाची कारवाई कोणावर कधी होणार हे लवकरच कळेल होईल. ते गुपितच ठेवलेलं बरं, असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्याकडे येण्यासाठी मोठ-मोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत, असा टोला उदय सामंत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.