विधानसभेच्या आपल्या पहिल्या भाषणातच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आपल्या भाषणात ते म्हणाले की, लेखी कामात वेळ घालवणार नाही तर थेट कार्यवाही करणार. याचदरम्यान एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होताच पहिला धक्का ठाकरे सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का दिला होता. आता शिंदे सरकारने ठाकरेंनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे.
२९ जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या निर्णयाला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली होती. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
तर पांडे यांना औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपद देण्यात आले होते. तसेच दिपा मुधोळ मुंडे यांना सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नियुक्त केले होते. यावर शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यामुळे पुढचा आदेश निघेपर्यंत अस्तिक कुमार पांडे औरंगाबादचे आयुक्त राहणार आहेत. तर अभिजित चौधरींना सांगलीला जावे लागण्याची शक्यता आहे.