एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते 10 तारखे दरम्यान देण्याचे आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिले होते. मात्र, त्यानंतर देखील गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर कर्मचाऱ्यांची पगार होत नव्हती. यामध्ये याही महिन्यात 12 तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. त्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. मात्र ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. त्यानंतर 300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आजच होणार आहेत.