मुंबई : महायुतीला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगल्या खात्यांची मागणी केली. यामुळे शिंदे गटात तणावाचे वातावरण होते. परंतु, अजित पवार गटाला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती समजत आहे. तर, मंत्रिपदाची संभावित यादीही समोर आली आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सातत्याने बैठकांचे सत्र होत आहेत. यामध्ये खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कसे खाते वाटप करायचे याचा फॉर्मुला ठरला. त्यानुसार अजित पवार आता त्यांच्या सहकारी मंत्र्यांची समजूत काढत असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाला 'ही' खाती मिळण्याची शक्यता
अर्थ
राज्य उत्पादन शुल्क
ग्रामविकास
सामाजिक न्याय
महिला बालविकास
पर्यटन
क्रीडा
अन्न नागरी पुरवठा
औषध प्रशासन
जलसंपदा
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी गटाला महत्त्वाची खाती देण्यात येणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचीही चर्चा आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन मंत्र्यांसाठी बंगल्यांचे वाटप करण्याचा निर्णय आज जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांसाठी मंत्रालयात दालनही वाटण्यात आले आहेत.