मुंबई : आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त परिषद घेत मोदी सरकारवर शरसंधान साधले. यावेळी नाती जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध असल्याचे विधान उध्दव ठाकरे यांनी केले होते. या विधानाचा समाचार आता शिंदे गटाने घेतला आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटर अकाउंटवरुन उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मातोश्रीला पुराचा वेढा पडलेला असताना वडिलांना घरात एकटं सोडून जाणं. सख्ख्या भावाला घराबाहेर काढणं. त्याच्यासोबत मालमत्तेवरुन उभा दावा मांडणं. पुतण्याला दुर्धर आजाराने पछाडले असताना त्याची साधी विचारपूसही न करणं. यालाच नाती जपणं असं म्हणत असतील तर उद्धवजींना कोपरापासून दंडवत, अशा शब्दात शीतल म्हात्रे यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
नाती जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही नाती जपतो. केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. दिल्लीसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु केंद्र सरकारने अध्यादेश आणला, ही कसली लोकशाही, असा सवाल त्यांनी केला होता.