Sharmila Thackeray : राज्याच्या राजकारणात अभुतपुर्व गोंधळ घडल्यानंतर आता महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 41 दिवसानंतर त्यांचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, एकही महिला मंत्रीमंडळात नसल्याने सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. दरम्यान, यावर मनसे नेते राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमावेळी बोलताना भाष्य केलं आहे. या सरकारमध्ये महिलांना नक्की स्थान मिळेल, भाजपकडे चांगल्या महिला आहेत. यात प्रामुख्याने त्यांनी पंकजा मुंडे यांचा उल्लेख केला आणि म्हणाल्या की, पंकजा यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगलेच होईल. (Sharmila Thackeray praises the work of Pankaja Munde)
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे ?
पुण्यात एका साडीच्या दुकानाच्या उद्घाटनाला शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणाबद्दल टीप्पणी करण्यास नकार दिला होता. मात्र पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्की स्थान मिळेल, भाजपकडे चांगल्या महिला नेत्या आहेत. यात पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हणत पंकजा मुंडे यांच्या कामाची स्तुती केली. तसेच महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यास मदत देखील होईल अस त्या म्हणाल्या.
मी मुलावर, पतीवर लक्ष ठेवून असते
शर्मिला ठाकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे काय करत नाही, यापेक्षा मला कुटुंब महत्वाचे आहे. माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे याच्यावर मी लक्ष ठेवून असते, शिवसेनेवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.