मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिवसेना व शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही गटाचे कान टोचले आहेत. दसरा मेळाव्यावरुन सुरू असलेलं राजकारण दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. तरी वातावरण बिघडू नये याची काळजी प्रमुख नेत्यांनी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांना दोन्ही गटांना दिला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, राज्यांत दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरू आहे. ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत. पण, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या सिनीयर मंडळीनाही सांगाव. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पहा, असा सल्ला त्यांनी शिवसेना व शिंदे गटाला दिला आहे.
तसेच, दसरा मेळावा हा शिवसेनेचा असून तो वेगळा पक्ष आहे. राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही, असे स्पष्टीकरही त्यांनी दिले आहे. २०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असतां तर मला समजलं असते. अशोक चव्हाण काही बोलले असल्याचे मला तरी माहिती नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी मदत अंधेरी येथील पोटनिवडणुक आज जाहीर झालेली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच पोटनिवडणूक जाहीर झाली असल्याने यात विजयासाठी आता दोन्ही पक्ष सर्वशक्ती पणाला लावणार हे निश्चित. अशातच शरद पवार यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचे म्हंटले आहे. तर, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव, अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही. निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे.