मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांना एमसीएच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्यावरून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नवी युती होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. यावर उत्तर शरद पवार यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी असतानाचा अनुभव सांगत प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले की, काही ठिकाण अशी असतात, त्यात राजकारण आणायचे नसते. मी जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीही माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. दिल्लीतून अरुण जेटलीही उपस्थित होते. अनुराग ठाकूर हिमाचलचे अध्यक्ष होते तेही हजर होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे आहे. बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही, असे म्हणत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का, या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते मला भेटायला आले होते. बाळासाहेब थोरात व अन्य काही नेते होते. त्यांनी विनंती केली की भारतात घेतलेला हा त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे. आणि साहजिकच आहे की पक्षाच्या लोकांनी पूर्ण ताकतीने त्यात सहभागी व्हायचे आहे. पण, यानिमित्त समाजामध्ये एक सामाजिक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भारत जोडो याचा अर्थ वेगवेगळ्या जाती-धर्माची-भाषिक एकत्र करण्याचा हा त्याचा उद्देश आहे. आणि त्याला एक प्रकारच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून आम्ही काही लोक ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी जाणार आहोत, असे त्यांनी सांगिततले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचे सुख-दुःख बघायला कोणी जात असेल ते तर शंका घ्यायचे काय कारण नाही. त्यांनी बघावं त्याच्यानंतर काय करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सूचना कराव्यात आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.