मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णया विरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तर, विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. अशातच, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा , 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रती क्विंटल दिलेला २४१० हा भाव कमी आहे. 4 हजार भाव द्यावा ही मागणी आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २४०० मध्ये निघणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, हा टिकणारा कांदा असून शेतकरी थांबायला तयार आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करावे, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.