राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातून वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरणात एकच आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. शिंदे- फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये सध्या खडाजंगी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
वेदांता प्रकल्पावर काय म्हणाले शरद पवार?
ज्या वेदांता प्रकल्पावरून राज्यात राजकीय घमासान सुरु आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जो प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेला त्या वेदांता प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागाच योग्य होती. आता हा प्रकल्प गुजरातला गेला तर या वर चर्चा का होत आहे? हा प्रकल्प पुन्हा राज्यात येणं अशक्य आहे. महाराष्ट्राबाहेर कुठलाही प्रकल्प जाणे हे राज्यासाठी दुर्दैवच आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोप न करता नवे काय करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाण्याचे खापर ठाकरे सरकारवर फोडणे अयोग्य आहे. हा प्रकल्प गेला म्हणून मोठा प्रकल्प देतो असे म्हणणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे. असे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.
पवारांनी सुनावले महाराष्ट्रातील नेत्यांना खडेबोल
नेतृत्वावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या नेतृत्वाबद्दल जनतेच्या मनात विश्वासाची भावना उरली नाहीय, सध्या विकास सोडून सत्ताधारी आणि विरोधक टीका करण्यात व्यस्त आहे. राज्यात उदयोगाला प्रोत्साहन देणारे नेतृत्त्व नाही. त्यामुळे राजकीय वातावरण कसं सुधारेल याकडे पाहाण्याची गरज आहे.
भाजपच्या मिशन बारामतीवर पवारांचा टोला
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मिशन महाराष्ट्र सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवार यांच्या बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यावरच पवार यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर विधान केले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी बारामती दौरा करणं चांगली गोष्ट आहे. हा सर्वांचा राजकीय अधिकार आहे असे विधान यावेळी त्यांनी केले. पुढे ते म्हणाले की, त्या बारामतीमध्ये येथील अनेक ठिकाणी नागरिकांना संबोधित करतील, जनतेचं म्हणणं त्यांचा भाषेत ऐकून घेतील, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी उपहासात्मक टीका केली.