आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडतो आहे. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
मला असं समजले तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली जात आहे. मी त्यांना सांगतो की सुनील शेळके तुम्ही आमदार कोणामुळे झालात, तुझ्या सभेला कोण आलं होतं, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
भाजपवर वॉशिंग मशीनचा आरोप करताना शरद पवार म्हणाले की, मुंबईमध्ये आदर्श सोसायटीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला, असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा.