मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी असे अनेक प्रश्न असताना सगळं सोडून सत्ताधारी अयोध्येला गेले आहेत, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
आपण बघतोय सर्व मंत्रीमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहे. आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवा, असा निशाणा शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर साधला आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. प्रश्न सोडवू शकत नाही, ते लोक अशी भूमिका घेतात, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
अदानी घोटाळ्याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी, अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, नाना पटोले पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांना त्यांचं मत आहे. मतभिन्नता असते. संसदेत खासदारांनी काय बोलावे, यावर वेगवेगळी मतं असू शकतात. चौकशी झाली पाहिजे, पण जेपीसी योग्य नाही. कारण लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार यावर त्याची रचना ठरते. यात सत्ताधारी बहुमत असते. पण जर सगळ्या विरोधकांची भूमिका असेल तर जेपीसी चालवा, माझा विरोध नाही. पण, जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश चौकशी योग्य असेल, असे मत त्यांनी मांडले आहे.
तर, सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती मान्य नाही. त्यांनी सांगितलं की गाय ही उपयुक्त पशू आहे. ज्या दिवशी उपयुक्तता संपेल, त्याचे भक्षण केलं तरी चालेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ईव्हीएमबाबत आमची जी तक्रार आहे ती खरी नाही हे दाखविण्यासाठी आयोग कधी अशी भूमिका घेते की, माझ्या मतदारसंघात काही चुकीचं करणार नाही. प्रश्न असा आहे की, जी चीप टाकतात, त्यावर काही तज्ञ लोकांना शंका आहे. यावर आम्ही काही प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाला दिले. आमची शंका दूर करा, आमची काही तक्रार नाही. पण जर तशीच निवडणूक घेतली, तर आमची शंका आहे, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.