पुणे : निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितले. देशात हुकूमशाही सुरु आहे. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याच काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितले. आजपर्यंत निवडणूक आयोगासमोर अनेक प्रकरणे गेली. पणं, असा निकाल कधी दिला नाही. मात्र, आज एकाकडून पक्ष काढून दुसऱ्याला देण्यात आला. शिवसेनेचा जन्म महाराष्ट्रात झाला. बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी संगितले होते की उद्धव ठाकरेंना सांभाळा. निवडणूक आयोगाने आता निर्णय दिलाय की शिवसेना आणि धनुष्यबाण ज्यांनी सुरुवात केली त्याच्याजवळ राहणार नाही. मी पणं पक्ष सोडला, माझी पणं भांडण झाली होती. निवडणूक आयोगासमोर आमचं प्रकरण गेले होते. तेव्हा आयोगाने इंदिरा गांधी यांना पंजा दिला. आम्हाला दुसरे चिन्ह दिलं. मूळ नाव कधी काढून घेतले नाही, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
आता ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अशा संस्थांचा वापर करुन घेत आहेत. देशात हुकूमशाही सुरु आहे. याची सगळ्यात मोठी किंमत अल्पसंख्यांक समाजाला भोगावी लागत आहे. पुणे शहर एकता ठेवणार शहर आहे. अल्पसंख्याक समुदाय काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीसोबत राहिला आहे. देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याच काम सुरू आहे, असे टीकास्त्र त्यांनी भाजपवर सोडले आहे.
दरम्यान, माझ्या बाबतीत पाहिलं कुणी काहीही अफवा पसरवेल. त्याच्याकडे लक्ष देऊ नका निवडणुकीवर लक्ष द्या. दिल्लीत देखील लोकांनी केजरीवालांना पसंती दिली म्हणून दिल्लीत केंद्र सरकार निवडणुका होऊ देत नाहीत. तीन वेळा निवडणूक आयोगाने निवडणूक लावली. पण, दिल्लीने रद्द केलीय कारण त्यांना माहिती आहे की ते राजधानी हरतील. यातून हेच दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते विरोधी पक्षांना काम करु देणार नाही. आता आपल्या सगळ्या लोकांना एकत्र यावं लागेल. कसबा निवडणूक खूप महत्वाची आहे, अशी साद शरद पवारांनी मतदारांना घातली आहे.