मुंबई : सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन मुलांची भांडण झाली तरी ईडी मागे लावेल, अशी धमकी दिली जाते इतकी ही व्यवस्था घराघरात पोहचली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होती. यावेळी ते बोलत होते.
अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवला गेला. त्यांच्यावर आरोप होता की 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि आता आरोपपत्र लिहाल आहे की सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेला 1 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. खोट्या केसेस करायच्या, डांबून ठेवायचं हे सुरू आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी सोडले आहे.
नवाब मलिक यांनाही असंच तुरुंगात धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्जावरील सुनावणी किती दिवस पुढे जातेय. आता 15 दिवसाला तारीख पुढे ढकलली जाते. राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. संजय राऊत यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं होतं.
आपले सहकारी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडलं म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांचा जावई तुरुंगात आत्महत्या करेल अशी त्यांची परिस्थिती करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. ही सगळी उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधात जे मत मांडतील त्यांच्यावर कारवाई करणार, असे शरद पवार म्हणाले.
कोणावर अन्याय झालं त्याच्या मागे ताकदीने उभे राहिले पाहिजे. या प्रवृत्ती विरोधात लढावे लागेल. काहीही किंमत द्यावी लागली तरी मागे हटायचं नाही ही भूमिका घ्यावी लागेल, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.