अमोल धर्माधिकारी | पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र डागले आहे. दोघांनीच सत्ता चालवायची असं ठरवलेलं दिसतंय. त्याला त्यांच्या राज्यातील नेत्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची संमती आहे असेच दिसत आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
राज्यात अभूतपूर्व बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. परंतु, भाजपच्या हे अद्यापही पचनी पडलेले दिसत नाही. आज चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे मनातील खदखद व्यक्त केली आहे. मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचे मोठे विधान पाटील यांनी केले आहे. याबद्दल शरद पवारांना विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी डोक्यावर दगड ठेवला काय, छातीवर ठेवला काय, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे निशाणा पाटलांवर साधला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्दयावरुन सध्या शिवसेना-शिंदे गट आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, सुरक्षा पुरवण्याची, कुणाला दयायची हे सर्वस्वी मुख्य सचिव, गृहसचिव आणि डिजी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असते आणि ते निर्णय घेत असतात. मंत्रिमंडळ ठरवत नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना झेड सुरक्षा होती आणि आहे. त्यामुळे यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
तर, शिंदे फडणवीस सरकारवर शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. दोघांनीच सत्ता चालवायची असं ठरवलेलं दिसतंय. त्याला त्यांच्या राज्यातील नेत्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची संमती आहे असेच दिसत आहे. त्यामुळे ते सत्ताधारी आहेत जे करतील ते स्वीकारावं लागेल, असे पवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मुलाबाळांच्या बोलण्यावर बोलण मी योग्य समजत नाही, अशी खिल्लीही नितेश राणे यांची शरद पवारांनी उडविली आहे. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.