मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. हलगर्जीपणा झाल्यावरती काय घडू शकते हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं, असे टीकास्त्र विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहेत. याला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कार्यक्रमाची वेळ १० ची निश्चित केली होती. येण्या-जाण्याची व्यवस्थाही केली होती. चांगला कार्यक्रम होण्यासाठी लागणारी खबरदारी घेतली होती. लाखो श्रीसेवक येणार या अनुशंगाणे मैदानात पाण्याची व्यवस्था वैदयकीय सेवा या होत्या. मात्र, कार्यक्रमाच्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेचं प्रमाण वाढलं. अनेक लोकांना त्रास झाला त्यांच्यावर उपचार आम्ही केले. मात्र, ८ जणांचा उपचारा दरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांचा आम्ही पेंडॉलमध्ये उपचार केले, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. तसेच, असा कार्यक्रम विरोधकांना घेता आला नाही याची सल विरोधकांच्या मनात आहे. त्यावरून टिका होतं आहे, असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे.
त्याच मैदानात नानासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला. तीच व्यवस्था होती. श्री सेवकांच्या सल्ल्यानुसार व्यवस्था होती. मुख्यमंत्री यांच्या पत्नी व खासदार श्रीकांत शिंदे हे इतर श्री सेवकांच्या सोबत होते. कुठलीही व्यवस्था स्वतंत्र नव्हती. निसर्गानुसार वातावरणीय बदलामुळे ही दुर्दैवी घटना घडली. अमित शहांच्या वेळेबाबतचा प्रश्न नाही. कुणी आता अफवा पसरवू नये. आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही शंभूराज देसाईंनी केला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याचा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यासाठी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर शंभूराज देसाई यांनी आमचे २०० चं टार्गेट आहे. कुणी आमच्या युतीत येऊन तो २५० चा करू इच्छित असेल तर स्वागतच आहे, असे म्हंटलं आहे.