मुंबई : शिवसेना आमदार दादा भुसे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रोत अपहार केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यावरुन आता शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले असून राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच, शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद केली नाही तर जशात तसे उत्तर देऊ, असा इशारा देसाईंनी दिला आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
मंत्रिमंडळातील दादा भुसे यांच्याबद्दल संजय राऊतांनी यांनी केलेले आरोप चुकीचे असून खोट्या माहितीच्या आधारे केले आहेत. हे केवळ दादा भुसेंना बदनाम करण्याचे काम आहे. राऊतांच्या आरोपांचा खुलासा सभागृहात दिला आहे, असे शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे. संजय राऊत रोज सातत्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. परंतु, आमच्याच 40 आमदारांच्या मतांवर तुम्ही खासदार म्हणून निवडून आले आहेत. तुमच्या हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच देसाईंनी राऊतांना दिले.
खोटे रेटून बोलायचं काम राऊत करत असतात. परंतु, सहनशिलतेच्या मर्यादा संपत आलेल्या आहेत. राऊतांनी वायफळ बडबड सुरु ठेवली तर त्यांना जशात तसे उत्तर देण्याचे काम आम्ही करणार आहोत. राऊतांना जी भाषा समजते त्या भाषेत देऊ, असे शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी ट्विटरद्वारे दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. भुसे यांनी गिरणा बचाओ समितीच्या माध्यमातून गिरणी शुगर अॅण्ड एलाइड इंडस्ट्रीज लि.ची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले.कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ ४७ मुख्य शेअरधारकांची नोंद आहे. त्यांच्याकडून १६ कोटी २१ लाख, ८ हजार ८०० रुपये शेअर्सची रक्कम एकत्र केली आहे. परंतु, तरीही दादा भुसे गिरणी सहकारी चिनी मिलला वाचवू शकले नाही. उलट शेतकरी आणि शेअर्सधारकांची फसवणूक केली, असे राऊतांनी म्हंटले आहे.